'...म्हणून मी अन् देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीला जातो'; एकनाथ शिंदेंनी सांगितले महत्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 04:36 PM2023-02-26T16:36:26+5:302023-02-26T16:38:16+5:30
मुंबईमध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.
मुंबई- मुंबई शहरातील सुशोभीकरण प्रकल्पातील ३२० कामांचा तसेच मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण करण्याच्या कामातील ५२ किलोमीटर लांबीच्या १११ कामांचा, व मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामांचा शुभारंभ सोहळा आज चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. मुंबईमध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय असलेले हे शहर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा आमचा निर्धार आहे, असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मुंबई शहर सुंदर, स्वच्छ आणि सुशोभित होत असल्याचा आनंद होत आहे. मुंबईची दरवर्षी तुंबई होत असल्याचे चित्र आम्हाला बदलायचे आहे, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
येत्या २ वर्षांत मुंबईतील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. मुंबईत सुरू असलेली ही विकासकामे पाहिली असती तर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आमचा नक्कीच अभिमान वाटला असता अशी भावना एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबईतील रस्ते आणि शहर सुशोभीकरण करून फक्त थांबणार नसून लोकांचे जीवनमान सुधारण्याला आमचे प्राधान्य आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याद्वारे मुंबईकरांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. याशिवाय एसआरए, म्हाडा, पोलीस वसाहती, बीडीडी वसाहती यातील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे, त्यासाठी गरज लागल्यास कायद्यात बदल करण्याची देखील आमची तयारी असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्याला आमचे प्राधान्य असल्याचे एकनाथ शिंदेंनी बोलताना नमूद केले.
#LIVE | बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... https://t.co/eUGP9uK7fW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 26, 2023
राज्याच्या विकासासाठी निधी आणायला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीला जातो. महाराष्ट्र राज्याकरिता हवे ते मागून घेऊन येतो, तुम्ही चांगले संबंध ठेवून मागणी केलीत, तर तुम्हाला मदत मिळते. नुसतं घरात बसून काही होत नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुंबई मनपा निवडणूका जवळ येत असून त्या नुसत्या आरोप करून नव्हे तर कामाच्या बळावर जिंकायच्या असल्याचे एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले.