Join us

नव्या राजकीय युतीची नांदी?; मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:08 AM

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई- गेले काही दिवस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलेली असतानाच राज यांच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. मात्र या कार्यक्रमाचा कोणाताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

राज ठाकरेंच्या निमंत्रणाला मान देऊन मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दीपोत्सव कार्यक्रमाला आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दिवाळी आपली संस्कृती आहे. दरवर्षी प्रमाणे मनसेने दीपोत्सव कार्यक्रम केला आणि त्या निमित्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, यापूर्वीही या दीपोत्सवाला हजर राहण्याची इच्छा होती; पण येता आले नाही असे म्हणत शिंदे यांनी त्यासाठी योगायोग लागतो, तो आज आला, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची प्रशंसा केली. राज ठाकरे शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात. चांगल्या सूचना करतात, आम्ही सरकार म्हणून त्यांना योग्य प्रतिसाददेखील देतो. ते आमच्याकडे रात्रीबेरात्री कधीही येऊ शकतात, असे शिंदे म्हणाले. आपले सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

शिवतीर्थ बंगल्यावर १० मिनिटे चर्चा

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस हे आधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले, काही मिनिटांत मुख्यमंत्रीही गेले. त्यानंतर तिघांची दहा मिनिटे चर्चा झाली आणि नंतर तिघे शिवाजी पार्कवर गेले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिदे यांनी शिवाजी पार्कवर असलेल्या दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस