काहीही कमी पडू देणार नाही; नरेंद्र मोदींसोबतची 'फोन पे चर्चा' एकनाथ शिंदेंनी सांगितली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 04:41 PM2022-07-04T16:41:21+5:302022-07-04T16:41:30+5:30
विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला, असा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.
मुंबई- राज्याच्या विधानसभेत आज बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण मागे हटणार नाही, असं म्हटलं आहे. तसेच अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
सत्तेचा फायदा शाखा प्रमुख, जिल्हाप्रमुखाला झाला पाहिजे. सत्तेचा फायदा हा तळागाळातील शिवसैनिकांना झाला पाहिजे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होता तरी फायदा शिवसैनिकांना होत नव्हता. आमच्या माध्यमातून आम्ही शिवसैनिकांच्या जीवनात बदल करण्यचा प्रयत्न करणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीमध्ये माझं खच्चीकरण होत होतं, विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला, असा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.
'माझं तुमच्यावर प्रेम होतं'; बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटताच आदित्य ठाकरे झाले भावूक
एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचे आभार मानले. तसेच शपथविधी सोहळाआधी नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत काही कमी पडू देणार नाही, असं आश्वासन दिलं. तसेच तुमच्या पाठीशी पहाडासारखं उभं राहू असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं, असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, आम्ही नैसर्गिक युतीच केली आहे. राज्यसभेत आमची सर्व मते आम्हाला मिळाली होती. मग फुटले कोणाचे, हे अजून कळत नाहीये. या निवडणुकीचे खरे कलाकार इथे बसले आहेत. त्यांनी कोणाची मते फोडली कोणालाच माहित नाही. काहीजण म्हणत होते, पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे. यावरही सभागृहात जोरदार हशा पिकला. यावेळी शिंदे यांनी नकळत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला.
देवेंद्र फणडवीसांनी सारा गेमचं पालटला-
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, इकडे सगळं घडवणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यसभेचे आमचे दोन उमेदवार होते. आमचे दोन्ही निवडून येणार होते, आम्ही फूल फिल्डिंड लावली होती. बाळासाहेब थोरात म्हणाले होते आम्ही ४२ घेतो, त्यांना आम्ही म्हणालो ४२चं घ्या, ४४ घेऊ नका, नंतर पुढे अडचण येईल. पण, नंतर त्यांनी ४४ घेतली आणि अजित पवारांनी ४३ घेतली. तरीदेखील आमची जागा आली असती, पण नंतर साला आमचा माणूस पडला. फडणवीसांनी सारा गेमच पालटला. हे वाक्य म्हणताच, सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी शिंदेंनी साला शब्द परत घेतला, पण जयंत पाटील उठून म्हणाले की, जे चालू आहे, चालू द्या. जे नैसर्गिक आहे, ते झालंच पाहिजे.