मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता बंडखोरांसह अन्य नेते आपापल्या मतदारसंघात, गावी परतत असून, त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. विविध माध्यमातून गेल्या काही दिवसांतील सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर पुन्हा एकदा भाष्य केलेले आहे. आम्ही काहीही बेकायदा केलेले नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांदरम्यानही विरोधकांनाच फटकारण्यात आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजप नेतृत्वाचा निर्णय तुमच्यासाठीही धक्कादायक होता का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना, भाजप सत्तेसाठी काहीही करते, असा लोकांचा दृष्टीकोन होता. मात्र, आम्ही ५० आमदारांनी हिंदुत्वाची आणि विकासाची भूमिका घेतल्यानंतर भाजपने मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत संपूर्ण देशवासियांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी एकनाथ शिंदे बोलत होते.
भाजपसोबत सरकार बनवून काहीही चुकीचे केलेले नाही
शिवसेनेच्याच आमदारांनी केलेले बंड देशभर चर्चेचा विषय ठरले. यावर बोलताना, आम्ही भाजपसोबत सरकार बनवून काहीही चुकीचे केलेले नाही. २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे आम्हाला हिंदुत्वाबद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भूमिका घेता येत नव्हती. तसंच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासंबंधीही आम्ही उघडपणे भूमिका घेऊ शकत नव्हतो, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आम्ही काहीही बेकायदा केलेले नाही. देशाचे संविधान, कायदे, नियम यांना धरूनच आम्ही आहोत. आमच्याकडे संख्याबळ आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. तसेच याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारल्याचेही दिसून आले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.