उद्धव ठाकरेंना १९९९ सालीच मुख्यमंत्री व्हायचे होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:31 AM2022-10-06T10:31:41+5:302022-10-06T10:32:42+5:30

चार डोकी सांगायची, त्यांचे उद्धव ऐकायचे. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी पक्षाचे पानिपत होऊ दिले, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.  

cm eknath shinde secret explosion uddhav thackeray wanted to become chief minister in 1999 itself | उद्धव ठाकरेंना १९९९ सालीच मुख्यमंत्री व्हायचे होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंना १९९९ सालीच मुख्यमंत्री व्हायचे होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्धव ठाकरे कधी चौकटीतून बाहेर पडले नाहीत. चौकटीतील लोक सूर्य पश्चिमेकडून उगवला सांगायचे आणि हे मानायचे. शिंदेंनी ते केले नाही. शिंदेंनी हिताचे सांगितले, ते मात्र तुम्ही ऐकले नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाच वर्ष पूर्ण करायची होती.त्यामुळे शिवसेनेचे पानीपत होत होते ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होता, असा गंभीर गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. १९९९ साली जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हाही यांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, असा दावाही शिंदेंनी केला.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा प्रत्येक मुद्द्याचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी बीकेसी मैदानावर अनेक गुपिते उघड केली. त्याचवेळी ठाकरेंवर आरोपांचे बाणही सोडले. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाकरेंनी मला आनंद दिघेंची मालमत्ता किती आणि कुठे आहे, असा सवाल केला. ज्यांचे बँकेत अकाऊंटही नव्हते, त्या दिघेंची मालमत्ता मला विचारली तेव्हा मला धक्का बसला असे सांगून शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यावर वाटेल ते आरोप करतात. आम्हाला त्याची पर्वा नाही, पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन जे पाप तुम्ही केले आहे, ते शिवसैनिक विसरणार नाही. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केले आहे, त्यासाठी बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेकून माफी मागा, अशा शब्दात शिंदेंनी टीका केली. 

४० आमदार, १२ खासदार, देशातील १४ राज्यप्रमुख, हजारो पदाधिकाऱ्यांनी मला का पाठिंबा दिला याचे तुम्ही आत्मपरीक्षण करा, आतापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे असे किती लोक गेले. इथे व्यासगपीठावर निहार, स्मिता वहिनी बसले आहेत. मग कोण चुकीचे, हे सगळे चुकीचे तुम्ही एकटे बरोबर का असा खोचक सवालही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे अडीच वर्षात केवळ अडीच तास मंत्रालयात गेले. कसा कारभार चालणार, तुमचा कारभार कुणालाही आवडत नव्हता. कोविड कोविड करून तुम्ही दुकाने, मंदिरे, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमची दुकाने सुरू होती, ती कसली ते मी सांगणार नाही. माझ्याशिवाय ते कुणाला चांगले माहित होते, असा गौप्यस्फोटही शिंदेंनी यावेळी केला.

पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आरएसएसवर बंदी घाला अशी मागणी काही लोकांनी केली. या देशाच्या उभारणीत आरएसएसचे मोठे योगदान आहे. देशावरील संकटात एकदिलाने काम करताना आरएसएसला आपण पाहिले आहे. राष्ट्रउभारणीच्या कार्यात या संघटनेचा हात कुणी धरू शकत नाही. आणि तुम्ही पीएफआयची आरएसएसशी तुलना करता, हे अत्यंत हास्यास्पद आणि मुर्खपणाचे आहे, असे सांगत आपल्या भाषणात शिंदेंनी आरएसएसचे कौतुक केले.
एखाद्याने चांगले घर घेतले, गाडी घेतली तर उद्धव ठाकरेंचा जळफळाट व्हायचा, याचा मी साक्षीदार आहे, ही तुमची वृत्ती, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

मला तुम्ही कटट्पा म्हणाला, पण कट्टपा पण स्वाभीमानी, प्रामाणिक होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आम्ही समोरून वार करणारे आहोत, तुमच्यासारखे पाठित खंजीर खूपसणारे नाही. आमचे शिवसैनिक तडीपार झाले, मोक्का लागले त्यांचे अश्रू तुम्हाला दिसले नाही .हे सरकार कुणावरही अन्याय करणार आहे. अन्यया करून कुणाचाही आम्हाला आमच्या पक्षात प्रेवश घ्यायचा नाही. असले धंदे तुम्ही केले आम्ही नाही करणार, असे उत्तर शिंदेंनी दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cm eknath shinde secret explosion uddhav thackeray wanted to become chief minister in 1999 itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.