लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. हे कारस्थान करताना माझाही कार्यक्रम करण्याचा विचार सुरू होता. पक्ष गेला शिवसैनिक गेले याबद्दल त्यांना काही घेणे देणे नव्हते, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.
लोकसभेचे रणांगण तापलेले असताना लोकमत व्हिडीओजचे संपादक आशिष जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक अवघड प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिला.
भाजपच्या चार-पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची पूर्ण तयारी तेव्हा करण्यात आली होती. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. मला हे सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता ते सरकार स्थापन करायचे होते म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांना नको ते उद्धव यांनी स्वीकारले
बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना खरी शिवसेना आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरेंना नको होते तेच उद्धव ठाकरेंनी स्वीकारले. ठाकरे यांच्याकडून काँग्रेसची भाषा बोलली जात आहे. सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी कधी तडजोड केली नाही. त्यामुळे नकली शिवसेना हे केलेले वक्तव्य खरे आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री