H3N2 इन्फ्लुएंझा आजाराच्या संसर्गाविषयी एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; महत्वाचे दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 09:10 PM2023-03-16T21:10:43+5:302023-03-16T21:15:01+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत इन्फल्युएंझा H3N2 आजाराच्या संसर्गाविषयी आढावा घेण्यात आला.
मुंबई: कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस थैमान घालतो आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात याचे रुग्ण आढळले असून यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्रात H3N2चे आतापर्यंत एकूण ३५२ रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. H3N2 व्हायरस कोरोनासारखाच जीवघेणा ठरणार की काय अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे. मात्र याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत इन्फल्युएंझा H3N2 आजाराच्या संसर्गाविषयी आढावा घेण्यात आला. इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार असून तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत आणि या आजाराविषयी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमून उपचार सुरू करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत इन्फल्युएंझा #H3N2 आजाराच्या संसर्गाविषयी आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/oRkVscdoku
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 16, 2023
ही लक्षण दिसताच सावध व्हा -
- H3N2 या व्हायरसच्या संसर्गात ताप, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी, डोळ्यांत जळजळ व खोकला अशी लक्षणे दिसतात.
- ताप दोन-तीन दिवसांत बरा होतो. पण, घशाचा त्रास थोडा जास्त काळ राहू शकतो.
- एवढेच नाहीतर, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने इतरांनाही बाधा होऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले बचावात्मक उपाय-
आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरसपासून बचावाचे उपायही सांगितले आहेत आणि काही सल्लेही दिले आहेत. यात मास्कचा वापर करा. हाताची स्वच्छता पाळा आणि वेळोवेळी हात धुवा. याच बरोबर वर्षांतून एकदा फ्लूची लस टोचून घ्या असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.