मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:49 PM2024-10-01T13:49:44+5:302024-10-01T13:50:23+5:30

नायर रुग्णालयातील कॉलेज विद्यार्थिनीवर लैंगिक छळ होत असून त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

CM Eknath Shinde took note of MNS demands;  Urgent order in 'Nair' hospital sexual harassment case | मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश

मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश

मुंबई - शहरात प्रसिद्ध असलेले मुंबई महापालिकेचे नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणाबाबत सकाळीच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत यावर उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशीची मागणी केली होती. पीडित विद्यार्थ्यांच्या पाठिशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भक्कम उभे आहेत असं देशपांडे यांनी म्हटलं होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणात रुग्णालयाचे डीन यांची बदली करून विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मनसेनं हा प्रकार समोर आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याशिवाय आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

मनसेनं केला होता आरोप

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले होते की, नायरमधील बरेच विद्यार्थी, विद्यार्थिनी आम्हाला भेटले. महाविद्यालयात कशारितीने लैंगिक छळ सुरू आहे हे त्यांनी सांगितले. हे विद्यार्थी प्रचंड घाबरलेले आहेत. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. महिलांच्या अंतर्गत समितीकडे एक जण दोषी आढळला. त्याला निलंबित करण्यात आले मात्र निलंबनानंतरही त्याला कॉलेजने बाहेर ठेवले नाही. महापालिकेने त्यांच्या अधिकारात मानवतावादी दृष्टीकोनातून त्या निलंबित व्यक्तीला कॉलेजच्या कॅम्पेसमध्ये राहण्यासाठी घर दिले. जो विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करतो त्याच्याबद्दल महापालिका प्रशासन कसला मानवतावादी दृष्टीकोन ठेवते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

त्याशिवाय हे सर्व प्रकरण ऑन रेकॉर्ड आहे. मुलींबद्दल माणुसकी नाही का? जर आमच्याबद्दल तक्रार केली तर आम्ही तुमच्यावर अट्रोसिटी टाकू, सुप्रीम कोर्टापर्यंत खेचू, जेलमध्ये टाकू असं धमकावलं जाते. लाडकी बहीण योजना काढायची आणि बहिणीवरील अशी प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करायचा असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. जेव्हा प्रकरण घडते, तेव्हा वेळीच रोखले पाहिजे त्यानंतर आरोपीचा एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत असं सवाल देशपांडेनी विचारला होता.  पोलीस, महापालिका प्रशासनाने एका संवेदनशील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून या नायर प्रकरणाची चौकशी करावी. नायरचे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. मनसे १०० टक्के या मुलांच्या पाठिशी आहेत असं मनसेने म्हटलं होते. 

Web Title: CM Eknath Shinde took note of MNS demands;  Urgent order in 'Nair' hospital sexual harassment case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.