Join us  

उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार का?; पत्रकारांचा आज पुन्हा प्रश्न, एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 6:53 PM

आज आमच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला.

मुंबई- सर्व लोकांना न्याय देण्याच काम आम्ही करु, लोकांच्या मनातलं हे सरकार आहे. केंद्र सरकार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी येत्या सहा महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं भाकित केलं आहे. शरद पवारांच्या या विधानावर पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता, शरद पवार बोलतात, त्याच्या उलट होतं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच आमचं सरकार पुढील अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

काहीही कमी पडू देणार नाही; नरेंद्र मोदींसोबतची 'फोन पे चर्चा' एकनाथ शिंदेंनी सांगितली!

आज आमच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला. खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच पत्रकार परिषदेत तुम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार का?, असा सवाल विचारला असता, एकनाथ शिंदे यांनी सदर प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

'माझं तुमच्यावर प्रेम होतं'; बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटताच आदित्य ठाकरे झाले भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनावरील केंद्रीय कर कमी केला होता. मात्र,  इतर काही राज्यांनीही व्हॅट कमी केला होता. पण, महाराष्ट्राने पाच पैसेही कमी केले नव्हते. महाविकास आघाडी सरकारनं पाच पैसेही कमी केले नव्हते. मात्र, आता आमचे हे नवे युतीचे सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभेचं आजचं कामकाज संपलं आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पडली तसंच विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. या विश्वासदर्शक ठराव भाजपा आणि शिंदे गटाने जिंकला. विधानसभा आता पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनामहाराष्ट्र सरकार