मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या नावाची पाटी आता वर्षा बंगल्यावर लागली आहे. २०१४ मध्ये मंत्री झाल्यापासून शिंदे हे मलबार हिलवरील नंदनवन बंगल्यामध्ये राहत होते.
३० जूनला मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचा मुक्काम अद्याप नंदनवन बंगल्यामध्येच आहे. मात्र आता ते लवकरच वर्षा बंगल्यावर मुक्काम हलवतील. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी एक आदेश काढून वर्षा बंगल्याचे वाटप त्यांना केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता पण, त्या आधीच म्हणजे २२ जूनला ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला होता व ते आपल्या मातोश्री बंगल्यावर मुक्कामी गेले होते. तेव्हापासून वर्षा बंगला नवीन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे.
देवगिरी बंगल्यात विरोधी पक्षनेते अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या देवगिरी या बंगल्यात देवेंद्र फडणवीस राहायला जातील, असे मानले जात असतानाच गेल्या आठवड्यात हा बंगला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना त्यांच्या विनंतीनुसार देण्यात आला. त्यामुळे फडणवीस हे सागर बंगल्यावरच राहतील, हे स्पष्ट झाले. पण आता व्यवस्थेच्या दृष्टीने फडणवीस यांना सागर बंगल्याशेजारी असलेला आणि सध्या रिकामा असलेला मेघदूत हा बंगलादेखील देण्यात आला आहे.