मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 12:22 PM2023-06-15T12:22:36+5:302023-06-15T12:26:43+5:30
Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा आषाढी एकादशी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत.
Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीसाठी पंढरपूरनगरी सज्ज झाली आहे. राज्यभरातील ठिकठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. अगदी उत्साहात वारकरी हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण मला देण्यात आले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तसेच पारंपरिक वारकरी पगडी आणि वीणा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्यांदा आषाढी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करण्याचे भाग्य
विठुमाऊलीच्या शुभाशीर्वादामुळेच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा आषाढी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करण्याचे भाग्य मला मिळाले असून, या निमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार करून या पूजेसाठी अवश्य उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा आदरपूर्वक स्वीकार केला, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेच्या सदस्या ऍड.माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, शंकुतला नडगिरे उपस्थित होते.