Eknath Shinde: एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; उद्या दिल्ली दौरा, नितीन गडकरी अन् अश्विनी वैष्णव यांनाही भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:41 PM2022-09-20T12:41:04+5:302022-09-20T12:54:51+5:30
वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
मुंबई- वेदांता-फॉक्सकॉर्न हा हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असून राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांची देखील भेट घेणार आहेत.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन संवाद साधला होता. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंना सांगितलं.
दरम्यान, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असं शिंदे यांनी म्हटलं.
गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे-
माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात औद्योगिक गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर होता. गुजरातला आम्ही मागे ठेवले, याचा मला आनंदच आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच वेदांता गुजरातमध्ये गेला, म्हणजे तो पाकिस्तानला गेला नसून, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे अशी आठवणही देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना करून दिली आहे.