Join us  

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर जाणार; सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 2:02 PM

शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. राज्यातील सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता.

मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहेत. यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबियांनी घरी गणपती बसवला असून गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आज संध्याकाळी राज ठाकरेंच्या दादर येथील निवासस्थानी पोहचतील. राज ठाकरे(Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

२ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तब्बल ५० आमदारांना सोबत घेत शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच धक्का दिला. शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता निसटली. त्यानंतर खरी शिवसेना आम्हीच असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. 

शिवसेनेतील या फुटीमुळे ठाकरे घराण्यातील महत्त्वाचे नेते असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखत देत या संपूर्ण प्रकारावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना दोषी धरलं. त्याचसोबत उद्धव ठाकरे विश्वासार्ह व्यक्ती नाही असं सांगत राज यांनी थेट हल्लाबोल केला. त्यानंतर शिंदे गट मनसेत विलीन करण्याची वेळ आली तर विचार करू असंही राज ठाकरेंनी म्हटलं होते. 

शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. राज्यातील सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. राज ठाकरेंकडे आक्रमक हिंदुत्वाची विचारसरणी आणि बाळासाहेबांचा वारसा या दोन्ही गोष्टी असल्याने शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो असा पर्याय पुढे आला होता. अद्याप हे प्रकरण कोर्टात असल्याने यावर कुणीही अधिकृत भाष्य करत नसलं तरी शिंदे गटाच्या आमदारांकडून राज ठाकरेंचे होणारे कौतुक हे राजकीय चर्चेसाठी पुरेसे कारण आहे. त्यात आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी भेट देणार असल्याने सर्वांचे लक्ष या भेटीवर आहे. 

भाजपा-मनसे युतीचं समीकरण? आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांच्या राज ठाकरेंशी भेटीगाठी वाढल्या आहेत. यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे दोनदा राज ठाकरेंना भेटले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपा-मनसे युतीचं नवं समीकरण राज्यात पाहायला मिळेल का हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेराज ठाकरेमनसेगणेशोत्सव