मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. दीड दिवसांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली होती. राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे या भेटीकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माहिम-दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सगळीकडे गणपतीचं आगमन झालंय. राज्यात उत्साहाचं आनंदाचं वातावरण पाहतोय. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त भेटीगाठी सुरू आहेत. राज ठाकरेंच्या घरी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो. मागे राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे गणपती दर्शन आणि प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली असं त्यांनी सांगितले.
तसेच या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट होती. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही भेट घडली. या भेटीत आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यात काम केले आहे. राजसाहेबांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात राज्यभर काम केले आहे त्यामुळे या भेटीत बऱ्याच जुन्या आठवणी चर्चेत आल्या असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोलालाडके मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवते. जी संधी मिळाली त्याचे सोनं करण्यासाठी काम सुरू आहे. आमचं मंत्रिमंडळ सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे आहे हे जनतेला दिसत आहे. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत धडाडीचे निर्णय आमच्या सरकारने घेतले आहेत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला. वरळीतील बॅनरवरून एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी उत्तर दिले.
वरळीत झळकले मुख्यमंत्री शिंदेंचे बॅनर्सआदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स झळकले आहेत. वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथं श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले आहेत. या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो आहेत त्यामुळे आता वरळीत शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.