मुंबई- शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्याची भूमिका घेत शिंदे गटाने तसा अर्ज महापालिकेकडे केल्याने शिंदेविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे चित्र आहे. शिंदे-ठाकरे हे या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने आता हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे यांच्यात संघर्ष सुरु आहे. पण शिवाजी पार्कवर कुणाची तोफ धडाडणार याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. पण शिंदे गटाची मात्र हालचाल सुरु झालीय. काही महत्त्वाच्या आमदारांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक पार पडल्याची माहिती असून या बैठकीत शिवतीर्थावर मेळाव्याच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यात आला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानूसार, एकनाथ शिंदे आणि काही महत्त्वाच्या आमदारांची एक भेट झाली आहे. त्या बैठकीत शिवतीर्थावर मेळाव्याच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यात आला. या तयारीत कार्यकर्ते कोणत्या गेटनं आत येणार? नेते मंडळी कुठे आणि कसे बसणार? इतर जिल्ह्यातून ट्रेनने कार्यकर्ते येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा आपण दावा करतो तर मग दसरा मेळावा आणि तोदेखील शिवाजी पार्कवरच आपण घेतला पाहिजे, असा आग्रह समर्थक आमदारांनी शिंदे यांच्याकडे धरला. त्यातच भाजपकडून या मेळाव्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचा शब्द दिला गेला, अशी माहिती आहे.
आधीच्या अर्जावर निर्णय नाही-
ठाकरे गटाने या मेळाव्यासाठी केलेल्या अर्जावर महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नसताना शिंदे गटाचे दादर-माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी शुक्रवारी शिंदे यांच्या नेतृत्वातील मेळाव्यासाठी अर्ज केला. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे.
...तर नेस्को, बीकेसीचा पर्याय-
महापालिकेने ठाकरे यांना परवानगी दिली वा प्रकरण कोर्टात जाऊन कोर्टाने ठाकरेंना परवानगी दिली तर पर्यायी जागा म्हणून शिंदे गटाने शिवाजी पार्कसोबतच मुंबईतील नेस्को, बीकेसी, सोमय्या आदी मैदानेदेखील या दिवशी बुक करता येतील का याची चाचपणी सुरू केल्याचे समजते.