एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; समर्थनार्थ समितीला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 07:29 AM2024-02-05T07:29:48+5:302024-02-05T07:30:10+5:30

‘एक देश एक निवडणूक’च्या समर्थनार्थ समितीला पत्र

CM Eknath Shinde's support for joint elections; Letter to the committee in support | एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; समर्थनार्थ समितीला पत्र

एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; समर्थनार्थ समितीला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात वारंवार होणाऱ्या निवडणुका या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या नसून त्यामुळे विकासात अडथळा येतो, असे नमूद करीत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. निवडणुकांसंदर्भातील उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत मांडलेला हा सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

आतापर्यंत ३५ राजकीय पक्षांकडून प्रतिसाद
‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावासंदर्भात सप्टेंबरमध्ये उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. ही समिती घटनात्मक चौकटीनुसार लोकसभा, राज्यांच्या विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भात राजकीय पक्षांची मते तपासून त्यानुसार केंद्र सरकारला शिफारशी देणार आहे. आतापर्यंत ३५ राजकीय पक्षांकडून हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय.

या निर्णयामुळे देशात पारदर्शक शासन येण्यास मदत होईल. एकाच वेळी निवडणुका झाल्यास त्यावर निवडणूक आयोगाच्या होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात होईलच, शिवाय पक्षीय खर्चातही कपात होईल.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

निवडणुकांवर हजारो कोटींचा खर्च
लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधीच मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझाेराममध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकांच्या सहा महिन्यांनंतर महाराष्ट्र, हरयाणा आणि देशातील अन्य राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. 
इतक्या कमी कालावधीत पाठोपाठ होणाऱ्या या निवडणुकांचा खर्च हजारो कोटींच्या घरात जातो. २०१९ साली लाेकसभा निवडणुकांसाठी ६ हजार कोटींचा खर्च आल्याच्या मुद्द्याकडे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात लक्ष वेधले. 

Web Title: CM Eknath Shinde's support for joint elections; Letter to the committee in support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.