Join us

“तुम्ही राजकारणात का येत नाही?”; अभिनेत्री स्वरा भास्करला ममता बॅनर्जी यांची ‘ऑफर’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 3:05 PM

ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना अनेक मान्यवरांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला स्वरा भास्करही उपस्थित होती.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी अनेक नेतेमंडळींच्या ममता दीदींनी भेटीगाठी घेतल्या. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांची संवाद साधला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी ममता बॅनर्जी यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar) राजकारणात का येत नाहीत, अशी विचारणा केली. 

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक विषयांवर अभिनेत्री स्वरा भास्कर आपली मते मांडताना पाहायला मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर अनेकदा स्वरा भास्करने निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर असताना झालेल्या एका कार्यक्रमात अन्य मान्यवरांसोबत स्वरा भास्करनेही हजेरी लावली. ममता बॅनर्जी यांना प्रत्यक्ष पाहता येणार यावर विश्वास बसत नाही. त्यांना खूप फॉलो करते. माझे विचार आणि माझी मते त्यांच्यासमोर ठेवण्यात खूप एक्साइटेड आहे, असे या कार्यक्रमापूर्वी स्वरा भास्करने म्हटले होते. 

तुम्ही राजकारणात का येत नाही

वाय.बी. सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमाला स्वरा भास्करसह शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा उपस्थित होते. यावेळी स्वरा भास्करने आपली मते आणि म्हणणे कार्यक्रमात मांडली. यानंतर ममता बॅनर्जी यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला तुम्ही राजकारणात का येत नाहीत, अशी विचारणा केली. तसेच शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला, असा मोठा आरोप करत, भाजप हा क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याची बोचरी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली. 

सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे

महेश भट तुम्हाला लक्ष्य करण्यात आले होते, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला लढले आणि बोलले पाहिजे. तुम्ही आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या, असा आवाहनही ममता बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थितांना केले. तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

टॅग्स :ममता बॅनर्जीस्वरा भास्करमुंबई