मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावस्पर्शी भेट मिळाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केलेल्या मदतीमुळे कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाल्याने मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी कृतज्ञभावनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १०१ रुपयांची मदत पाठविली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) येथील वेदांत पवार हा पाच वर्षीय मुलगा पित्ताशयाच्या कर्करोगाने पिडीत होता. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात, तर आई शेतात मजुरी करते. या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. बालकाची आत्या रेणुका गोंधळी यांनी मार्ग काढण्यासाठी मोबाईलवर मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचारापोटी एक लाख ९० हजारांची मदत करण्यात आली. त्यातून मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात वेदांतवर उपचार करणे शक्य झाले. त्याला जीवदान मिळाले.
मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले.