Join us

CM शिंदे, कार्यकर्त्यांना आवरा, शिवाजी महाराजांशी अशी तुलना नको; मनसेनं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 9:23 AM

मनसेनं सर्वांनाच सुनावलं आहे. तर, अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचाही सल्ला दिलाय. 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह देशातील कोट्यवधी जनतेचं प्रेरणास्थान आहे. शौर्य आणि युद्धनितीतून शिवरायांनी जगासमोर आदर्श निर्माण केलाय. स्वराज्य निर्मित्तीचा ध्यास घेत रयतेचा राजा बनून राज्यकारभार केल्यानेच आज घराघरा शिवरायांच्या विचारांचे मावळे तयार होत आहेत. महाराजांना आदर्श मानणाऱ्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज हे राजकीय लोकांचं भांडवल बनताना दिसत आहे. त्यातूनच, आपल्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची उपाधी देण्याचा, त्यांच्याशी तुलना करण्याचाही प्रघात पडत आहे. त्यावरुन, मनसेनं सर्वांनाच सुनावलं आहे. तर, अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचाही सल्ला दिलाय. 

शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना छत्रपती शिवाजी महाराजांच्याजागी दाखवण्यात आल्याने मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपल्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा, अशी सूचनाही त्यांनी केलीय.

छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली होती, त्याच तलवारीच्या जोरावर महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, अशी कथा इतिहासात सांगितली जाते. त्यानुसार, भवानी मातेकडून तलवार स्वीकारतानाचा महाराजांचा फोटोही पाहायला मिळतो. मात्र, आता अशाच पद्धतीने एक चित्र काढण्यात आले असून शिवाजी महाराजांच्या जागी एकनाथ शिंदे तर भवानीमातेच्या जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरेंना दर्शवण्यात आलंय. बाळासाहेबांच्या हातून एकनाथ शिंदे धनुष्यबाण घेत आहेत, असेही त्यात दिसून येते. त्यावरुन, राजू पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. 

कोणी स्वतःलाच 'जाणता राजा' म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा, अशी सूचना करत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना आपल्या ट्विटमध्ये मेन्शनही केलंय. त्यासोबतच, व्हिडिओही शेअर केला आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेछत्रपती शिवाजी महाराजमनसेराजू पाटील