Join us

माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार; राजन विचारेंचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 11:00 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

मुंबई-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असं राजन विचारे यांनी म्हंटलं आहे. या संदर्भात राजन विचारे यांनी पोलीस महासंचलकांना पत्र देखील पाठवलं आहे. 

राजन विचारे यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या सूचनेनुसार पोलीस सरंक्षणात कपात केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील. माझ्या पोलीस संरक्षणात वाढ करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

"महाराष्ट्र शासनानं सूडबुद्धीने माझी सुरक्षा काढली आहे. मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यासोबत कुठलाही प्रकारची दुर्घटना घडल्यास किंवा हल्ला झाल्यास अथवा माझ्या कुटुंबीयांना काही धोका निर्माण झाल्यास याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील", असं राजन विचारे यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाकडून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर आणि सूडबुद्धीने तडीपार करणे, एमआरटीपी, प्रक्षोभक भाषण, खोट्या चॅप्टर केस टाकणे, आक्षेपार्ह घोषणा दिल्या बद्दल नोटीस बजावण्यात येत आहेत. तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वषानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या जागेवर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वतःला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता आहे. तरी सुद्धा आमच्याकडून संयम ठेवलेला जात असल्याचेही खासदार विचारे यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :ठाणेएकनाथ शिंदे