Join us

मोठी बातमी! कोस्टल रोड कामातील कोळी बांधवांच्या प्रश्नावर CM शिंदेंनी तोडगा काढला, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 6:00 PM

स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांच्या कडव्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोस्टल रोड प्रश्नी अखेर आंदोलनकर्त्यांना मोठे यश मिळाले आहे.

मुंबई- 

स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांच्या कडव्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोस्टल रोड प्रश्नी अखेर आंदोलनकर्त्यांना मोठे यश मिळाले आहे. प्रकल्पातील जाचक अटींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेऊन महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन पीलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी आता १२० मीटर इतकं असणार आहे, याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. यावेळी कोस्टल रोड बाधित कोळी बांधवांची समितीचे सदस्य देखील उपस्थित होते. 

प्रकल्पबाधित असलेल्या कोळी समाजाने सुरुवातीपासूनच कोस्टल प्रकल्पात बांधल्या जाणाऱ्या खांबांपैकी २ खांबांमधील अंतर हे १२० मीटर असावे अशी मागणी लावून धरली होती. ही मागणी आज मान्य करण्यात आल्यानं प्रकल्पग्रस्त बांधवांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. तसंच कोळी महोत्सवाला येण्याचंही निमंत्रण यावेळी दोन्ही नेत्यांना दिलं. 

"कोस्टल रोड शहरासाठी महत्वाचा पायाभूत प्रकल्प असला तरी हे सरकार भूमिपुत्रांचं सरकार आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प राबवतोय तिथं लोकांवर अन्याय होऊ नये अशी बाळासाहेबांचीही भूमिका राहिली आहे. प्रकल्पातील दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी १२० मीटर असावं अशी मागणी होती. पण प्रकल्पाचं काम ७० टक्के पूर्ण झाल्यानं अडचण निर्माण झाली होती. यात काय तोडगा काढता येईल यासाठी इकबाल सिंह चहल यांना लक्ष घालण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती घेत अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. जास्तीचे पैसे खर्च झाले तरी चालतील. लेटेस्ट तंत्रज्ञान वापरावं लागलं, मागवावं लागलं तरी चालेल. पण स्थानिकांचे प्रश्न सोडवूनच पुढे जाता येईल अशी आमची भूमिका राहिली आहे. आता आम्ही कोस्टल रोडमधील दोन पिलरचं अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन मच्छीमारांच्या बोटी सहजपणे समुद्रात ये-जा करु शकतील", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :एकनाथ शिंदे