शिंदे करणार नालेसफाईची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 02:42 PM2023-05-18T14:42:59+5:302023-05-18T14:44:13+5:30
मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतल्या नालेसफाई सारख्या कामांची पाहणी करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई : मुंबईतील नालेसफाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुंबईतील नालेसफाईची पाहणी गुरुवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिठी नदीच्या सफाईची पाहणीही ते करणार आहेत. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतल्या नालेसफाई सारख्या कामांची पाहणी करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाळ्यात मुंबई तुंबू नये म्हणून पालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यंदा पालिकेने मार्च महिन्यात नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली असून, पालिका प्रशासनाने ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मुंबई शहर व उपनगरात १५०८ छोटे व ३०९ मोठे नाले आहेत. याशिवाय २ हजार किमी लांबीची रस्त्यालगत गटारे आहेत. या गटारांद्वारे व मुंबईतील पाच नद्यांतून पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. यावर्षी अर्थसंकल्पात नालेसफाईसाठी २२६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लहान व मोठ्या नाल्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पालिका होतेय टार्गेट
पालिका प्रशासनाकडून नालेसफाईचे काम ८५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पालिकेच्या नालेसफाईवर दोन दिवसांपूर्वीच आरोप केले आहेत. तर काँग्रेस नेते नसीम खान यांनी देखील नालेसफाईवरून पालिकेला टार्गेट केले आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईची पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याने केवळ मुंबईतीलच नालेसफाईची पाहणी का, इतर महापालिका हद्दीतील नाल्याच्या सफाईची पाहणी का नाही, असा सवाल विचारला जात आहे.