सीएम सर, आमची शांतता भंग होतेय, मलबार हिलच्या रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:01 PM2024-09-07T13:01:57+5:302024-09-07T13:02:14+5:30

Eknath Shinde News:  मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला, त्याच्याच आजूबाजूला असलेले अग्रदूत आणि नंदनवन हे अन्य दोन शासकीय बंगले, या तीनही बंगल्यांमध्ये सातत्याने सामान्य नागरिक, राजकीय कार्यकर्ते, नोकरशहा, पोलिस अधिकारी, उद्योगपती आदींचा राबता असतो.

CM Sir, Our peace is being disturbed, letter from residents of Malabar Hill to Chief Minister | सीएम सर, आमची शांतता भंग होतेय, मलबार हिलच्या रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सीएम सर, आमची शांतता भंग होतेय, मलबार हिलच्या रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 मुंबई - मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला, त्याच्याच आजूबाजूला असलेले अग्रदूत आणि नंदनवन हे अन्य दोन शासकीय बंगले, या तीनही बंगल्यांमध्ये सातत्याने सामान्य नागरिक, राजकीय कार्यकर्ते, नोकरशहा, पोलिस अधिकारी, उद्योगपती आदींचा राबता असतो. छोटेखानी राजकीय सभा, कार्यक्रम, बैठकाही या ठिकाणी होत असतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढते. या सगळ्याचा त्रास येथील स्थानिकांना होत असून त्यासंदर्भातील रीतसर तक्रारच येथील रहिवाशांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

मलबार हिल परिसरातील १४ गृहनिर्माण संस्थांतर्फे ‘फ्रेण्ड्स ऑफ मलबार हिल’ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रारींचा पाढा वाचला आहे. अग्रदूत आणि नंदनवन बंगला येथे राजकीय कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठका होतात. त्यामुळे या तिन्ही बंगल्याच्या परिसरात मोठी वर्दळ असते. राजकीय कार्यकर्त्यांच्या मोठ्या आवाजातील घोषणा, मोठ्या आवाजात लावलेली गाणी, ध्वनिक्षेपकांवर सुरू असलेली भाषणे यामुळे परिसराची शांतता भंग होते.

तक्रारी करूनही दुर्लक्ष 
वाहनांमधून येणाऱ्यांनी रस्त्यावर टाकलेला कचरा यामुळे आम्हा रहिवाशांना त्रास होतो. आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण असतात. त्यांना या आवाजाचा-कचऱ्याचा त्रास होतो. अस्ताव्यस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावर चालताना अडचणी येतात. अशा प्रकारच्या तक्रारी या पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात वारंवार संबंधितांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही या पत्रात नमूद आहे. 

मुख्यमंत्री योग्य कार्यवाही करतील...!
वर्षा बंगला आणि सह्याद्री अतिथीगृह येथे सतत वाहनांची वर्दळ असल्याने येथे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. अनेकदा गाड्या विचित्र पद्धतीने पार्क केल्याने असे होते. त्यामुळे स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शांत आणि सुरक्षित वातावरण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून, या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री योग्य कार्यवाही करतील, अशी आशाही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

 

Web Title: CM Sir, Our peace is being disturbed, letter from residents of Malabar Hill to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.