Join us  

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र 'राज'भेटीला! 'शिवतीर्थ'वर खा. श्रीकांत शिंदे पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:56 PM

भाजपा-मनसे-बाळासाहेबांची शिवसेना या तीन पक्षांची महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीने याबाबतचे संकेत मिळत आहे.

मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलेला दिसून येत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्क येथे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या दिपोत्सवाला आर्वजून उपस्थित होते. शिंदे-फडणवीस-ठाकरे यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असं चित्र भविष्यात पाहायला मिळेल का? असा प्रश्न उभा राहिला आहे. 

भाजपा-मनसे-बाळासाहेबांची शिवसेना या तीन पक्षांची महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीने याबाबतचे संकेत मिळत आहे. आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. श्रीकांत शिंदे यांच्या राजभेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. नुकतेच श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली येथे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट दिली. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. 

उद्धवना शह देण्यासाठी राज यांनापाठबळ१. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मात द्यायची तर शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे सोबत असावी असे मानणारे भाजपमध्ये काही नेते आहेत. दुसरीकडे राज यांना सोबत घेऊन अधिक फायदा होईल की ते विरोधात लढले तर अधिक फायदा होईल याचा नीट अभ्यास करूनच निर्णय घ्यावा असे काही नेत्यांना वाटते.

२. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या वतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे वेगळी लढल्यास होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडेल की शिवसेनेच्या याचाही अभ्यास केला जात आहे.

मुंबईत एकत्र, इतरत्र स्वतंत्र?१. मनसेला मुंबईत सोबत घ्यावे आणि ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ते वेगळे लढले तरी चालेल अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी आणि विशेषतः पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांनी पक्षाकडे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

२. राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत. फक्त मुंबईत युती केली तर मुंबईच्या प्रचारात ते भाजपचे कौतुक करतील आणि अन्यत्र युती नसेल तर जोरदार टीका करतील. त्यामुळे विसंवादाचे चित्र निर्माण होईल. तसेच राज ठाकरेदेखील युतीचा असा प्रस्ताव मान्य करणार नाहीत असे या वरिष्ठ नेत्यांना वाटते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :श्रीकांत शिंदेराज ठाकरे