ठाणे : मुरबाडमधील शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी बदलापूरमार्गे मुरबाडमध्ये दाखल झाले. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी बदलापूरमार्गेच डोंबिवली गाठली. मात्र, दोन दिवसांपूर्वीच महापुराने बाधित झालेल्या येथील कुटुंबीयांची भेट घेण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. पूरग्रस्त नागरिकांमधून यावर संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि नव्या पोलीस स्टेशनचा उद्घाटन सोहळा मुरबाड येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमपत्रिकेनुसार मुख्यमंत्र्यांनी मुरबाडमध्ये दुपारी २ वाजता येणे अपेक्षित होते. मात्र, मुंबईत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आल्याने, त्यांना मुंबईहून निघण्यासच उशीर झाला. त्यामुळे नियोजनातील बारवी धरणाच्या जलपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दीड तास उशिरा आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दुपारी ३.३० वाजता पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर, पोलीस स्टेशनचे उद्घाटन उरकले आणि थेट सभास्थळ गाठले. सायंकाळी ४.३० वाजता त्यांचा डोंबिवलीचा पुढील प्रवास हा बदलापूरमार्गे असल्याने, मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करतील, अशी अपेक्षा बदलापूरकरांना होती. मात्र, नियोजनात पाहणी दौरा नसल्याने आणि आधीच कार्यक्रमाला पोहोचण्यास विलंब झाल्याने त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी न करताच थेट डोंबिवली गाठली.पूरपरिस्थितीचा आढावाही नाहीतत्पूर्वी, मुंबई-शीळफाटामार्गे मुख्यमंत्री बदलापूरला आले आणि बारवी धरण रोडमार्गे मुरबाडला पोहोचले. याच मार्गावर असलेल्या वालिवली गावाजवळील उल्हास नदीच्या पुलावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा गेला. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने त्यांचा ताफा थेट निघाला. परतीच्या प्रवासातही याच पुलावरून त्यांचा ताफा गेला. मात्र, त्यावेळीही त्यांचा ताफा पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थांबला नाही.