Sanjay Raut: उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...; संजय राऊतांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 04:23 PM2022-02-15T16:23:39+5:302022-02-15T16:25:43+5:30
संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले.
Sanjay Raut Press Conference vs BJP LIVE Updates : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. 'तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका'...आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. 'संजय राऊतजी तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है', असं सर्वजण म्हणाले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देखील मला फोन आला आणि मला आर्शिवाद दिले, असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, दादर येथील शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेसाठी गर्दी जमली आहे. राज्यभरातील शिवसेना कार्यलयातही शिवसैनिक एकवटले आहेत. मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये शिवसैनिकांनी पोस्टबाजी केली आहे. पुण्यातील शिवसेनेच्या पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय आहे.
राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन- भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांच्या मनात काय आहे, ते नेमकं कोणाला उद्देशून बोलत आहेत ते मी कसं काय सांगणार, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन. मी दिल्लीला निघालो आहे. त्यामुळे राऊत यांची पत्रकार परिषद सुरू असताना मी प्रवासात असेन. मला दिल्लीत पत्रकार याबद्दल विचारतीलच. त्यावेळी मी प्रतिक्रिया देईन, असं पाटील यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते संजय राऊत?
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ महाविकास आघाडीचे मंत्री तुरुंगात जातील. त्यांच्या कोठडीच्या बाजूला त्यांची जागा असेल असं भाजपचे नेते वारंवार सांगत असतात. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. राज्यात सरकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा, असा गर्भीत इशाराच राऊत यांनी दिला.
आम्हाला वारंवार धमत्या दिल्या जाताहेत. आव्हानं दिली जात आहेत. राजकारणात एक मर्यादा असते. ती ओलांडली गेली आहे. हमाम सब नंगे होते है. आम्हाला धमक्या देऊ नका. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मी तर अजिबात भीत नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा, असं राऊत म्हणाले.