मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार; दिल्लीकडे राज्याचं लागलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 02:37 PM2021-06-07T14:37:14+5:302021-06-07T16:29:05+5:30
उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेते उद्या (८ जून रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान लसीकरण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांच्यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षणायासंदर्भात देखील चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
A delegation of Maharashtra government led by CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar will meet PM Modi in Delhi tomorrow. They will discuss issues like Maratha reservation, OBC reservation and cyclone relief: State Home Minister Dilip Walse Patil pic.twitter.com/pj2d6je8i6
— ANI (@ANI) June 7, 2021
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे.
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उद्या मराठा आरक्षणावर देखील चर्चा होणार आहे. या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.
मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही- संभाजीराजे
तुम्ही माझा संयम पाहिला, पण आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरून मांडली. संभाजीराजे म्हणाले की, समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे.आज समाजाची वाईट परिस्थिती आहे. मग त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे मग मराठ्यांना नाही. मी राजकारणी नाही आणि राजकारण करत नाही. माझ्यावर काहीजण मध्यंतरी नाराज झाले होते. पण समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नाही. सांगताना चुकलो असेल तर दिलगीर आहे परंतु मला समाजाला वेठीस धरायचं नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले.
कोरोनाचं संकट असल्याने काही करता येत नाही. आपण जगलो तरच समाजाला न्याय देता येईल. महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ. काही चुकत असेल तर माफ करा. अनेक शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती नेमली. तिने अहवाल दिला आहे शिफारशी केल्यात. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर जे बोललो तेच समितीने अहवालात मांडलं आहे. मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही अशा शब्दात संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.