Uddhav Thackeray, Rashmi Thackeray, Mahavikas Aaghadi : महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किरीट सोमय्या यांनी या वादासंदर्भात पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याही नावांचा उल्लेख केला. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. पण असे असतानाच एका अतिशय सकारात्मक विधानामुळे श्री व सौ ठाकरे यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकीचे वातावरण टिकून आहे, असे विधान राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले.
यशोमती ठाकूर या सोमवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीत एकी आहे आणि ती एकता टिकून राहिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना श्री व सौ ठाकरे यांच्या स्वभावामुळे एकप्रकारे आधार मिळतो. किरीट सोमय्या यांनी ठाकरे दाम्पत्यावर केलेले कोणतेही आरोप खरे नाहीत. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात सत्ता मिळालेनी नाही. त्याच्या नैराश्यातून कायम दुसऱ्याची बदनामी करण्याची भाजपाला सवय लागली आहे."
काँग्रेसला वगळून मोदीं विरोधातली लढाई यशस्वी होणार नाही!
"काँग्रेसला वगळून पंतप्रधान मोदी यांच्या सरकारविरोधातील लढाई यशस्वी होणार नाही. विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळते आहे ती काँग्रेसमुळेच आहे. पंजाबनंतर आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकांमध्ये विजय मिऴवण्यासाठी भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान काँग्रेसवर निशाणा साधत आहेत", असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
"जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या संचालकांवर ईडीची चौकशी लावण्यात आली. पण घोटाळा झालाच नव्हता, त्यामुळे आमची भाजपाने प्रचंड बदनामी करण्याचा प्रयत्न करूनदेखील आमचाच विजय झाला. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. त्यामुळे संकटांना आणि भाजपाला आम्ही घाबरणार नाही. भाजपा सध्या ज्या प्रकारचे राजकारण करत आहे त्यानुसार उद्या गावच्या सरपंचावरही ईडीची चौकशी लावण्यात आली तरी आता त्याचं कोणालाच आश्चर्य वाटायचं कारण नसेल, असा खोचक टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपाला लगावला