Join us

Mumbai Property Tax Waiver: महापालिका निवडणुकीची नांदी, मुंबईकरांची झाली चांदी; मालमत्ता करमाफीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 7:00 AM

मुंबईकरांना नववर्षाची भेट ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा; निर्णय तत्काळ अंमलात आणा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याचा लाभ मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सुमारे १६ लाख घरांना होणार आहे. त्यासाठी महापालिकेला सुमारे ४६२ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २०२२-२३ च्या आर्थिक वर्षापासून केली जाणार आहे. गेले अनेक दिवसांपासून मुंबईकरांमध्ये या सवलतीबाबत चर्चा होती.

 नेमके काय झाले? जून -२०१९ मध्ये मुंबईतील ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा सर्वसाधारण कर रद्द करण्याचा निर्णय झाला होता. हा कर वगळता उर्वरित नऊ प्रकारचे कर मालमत्ता धारकांकडून वसूल केले जात होते. नव्या घोषणेमुळे आता पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कोणत्याच प्रकारचा मालमत्ता कर लागू होणार नाही.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी हॉस्पिटलमधून परतल्यानंतर प्रथमच सर्वसामान्यांशी संवाद साधला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच, मुंबईकरांना सुविधा द्यायच्याच आहेत, शिवाय मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाहीत. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळते, हा खरा प्रश्न आहे, असे ठाकरे म्हणाले. 

आमची चौथी पिढी१९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा, वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पाहणी करत. मीही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल  किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पाहत होतो, आता हे काम आदित्य करत आहे, अशा भावना ठाकरे यांनी व्यक्त केल्या. 

देशाचे आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबई उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय, त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत. २०१७ ला जे निवडणुकीत शिवसेनेने वचन दिले त्यातील आज एक महत्त्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

मालमत्ता कराबद्दलच्या या निर्णयाचा लाभ १६ लाख कुटुंबांना होणार आहे. हा मुंबईकरांसाठी क्रांतिकारी निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ आहे. त्यामुळे रुग्णालयात असतानाही ते जनतेसाठी काम करत होते, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केेले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे आभार मानले.

देर आए दुरुस्त आए - फडणवीसमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. २०१७ रोजीचे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले, देर आए दुरुस्त आए, असे फडणवीस यांनी त्यात म्हटले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईमुंबई महानगरपालिका