CM Uddhav Thackeray calls Kalpita Pimple: ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरोपी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन पिंपळे यांना दिलं आहे.
"तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा", असा शब्द मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळे यांना दिला आहे.
राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला
ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी नरेश म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन त्यांचं कल्पिता पिंपळे यांच्याशी बोलणं करुन दिलं. मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळेंच्या तब्येतीची विचारपूस करतानाच आरोपी फेरीवाल्यावर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट!, महापालिका प्रशासनावर टीका
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?"जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. पण तुम्हाला एक शब्द देतो. तुम्ही धैर्य दाखवलं आणि बरं झाल्यावर पुन्हा काम करणार आहात. आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. मला रोज रिपोर्ट येत असतात. पण उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. मला माहिती मिळत असते. बाकी आपण बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार", असं मुख्यमंत्री फोनवर म्हणाले.
महापालिका कार्यक्षेत्रात रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी होणारे अतिक्रमण हटविणेबाबत वेळोवेळी कारवाई केली जाते. परंतु काही समाजकंटकांकडून अशा प्रकारचे गैरकृत्य केले जाते. अशा घटनांमध्ये गुन्हेगारावर कारवाई होते परंतु हे गुन्हेगार जामीनावर सुटल्यानंतर मोकाट फिरत असतात. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होते. या घटनेसंदर्भात आम्ही महासभेमध्ये एकमताने ठराव करुन सदरचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा करावी असा ठराव मा. न्यायालयाकडे सादर करणार असल्याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे उभ्या राहत असलेल्या कोणत्याही फेरीवाल्यांकडून नागरिकांनी वस्तू खरेदी करु नये, जेणेकरुन भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाही असे नमूद करीत सर्व ठाणेकर नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी केले.
राज ठाकरेंनीही घेतली होती भेटकल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. हल्लेखोर आरोपी पोलिसांच्या तावडीतून जामीनावर वगैरे सुटला तर तो बाहेर येताच मनसैनिक त्याला चोप देखील असं रोखठोक विधान राज यांनी याधीच केलं होतं.
राज ठाकरेंनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही रुग्णालयात जाऊन पिंपळेंची भेट घेतली होती.