मुंबई: महाराष्ट्रात आलेल्या तौत्के Tauktae चक्रीवादळाने हाहाकार माजवला. या वादळामुळे महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध ११ हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर १० हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे. आत्तापर्यंत १३ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातकडे मार्गस्थ झालं असलं तरीही या वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोनाचं संकट सहन करणाऱ्या राज्याला आता या वादळाच्या संकटाचाही सामना करावा लागला.
महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध यंत्रणा सज्ज होत्या. तसेच नागरिकांना लवकरात लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासन यंत्रणेला दिले होते. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी, असं संजय राऊतांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घटल्या. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया या सुप्रसिद्ध वास्तूजवळ असलेल्या रस्त्यांवरही पाणी जमा झालं होतं. हवामान विभागाने महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ आणि वातावरणात अचानक झालेले बदल या सगळ्यासाठी राज्याच्या प्रमुख किनाऱ्यांवर एनडीएआरएफची पथकंही तैनात करण्यात आली होती.
गुजरातमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान-
तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री उशिरा सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले. अतिशय तीव्र स्वरूपाच्या या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झालेला नव्हता.
सोमवारी दुपारनंतर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही किलोमीटर अंतरापासून गुजरातकडे सरकले. त्यावेळी ताशी १९० किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला. गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते.
१६ हजारांवर घरांचे नुकसान
१६ हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ४० हजार झाडे आणि १० हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे सौराष्ट्र, दीव, उना इत्यादी भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता. सुमारे १६ कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी १२ रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.