लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आम्ही २५ वर्षे साप पाळला, आता तो आमच्यावर फूत्कारतोय, पण त्याला कसे ठेचायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवाच, असेही त्यांनी ठणकावले.
महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार यांचे स्नेहभोजन आणि बैठक अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी बुधवारी झाली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले की, आज सरकार पाडतो, उद्या सरकार पाडतो, असे काही जण म्हणताहेत. आमचे सरकार मजबूत आहे. १७० आमदार हे आमचे मोहरे आहेत. एकही जण कुठे जाणार नाही. आम्ही २५ वर्षे पाळलेले सापाचे पिल्लू आता वळवळ करत आहे, ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. दाऊदशी आमच्या लोकांचा संबंध जोडता. हिंमत असेल तर दाऊदला पकडून दाखवा. आम्हाला उगाच त्रास द्याल तर ते खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अशी सूडबुद्धी पाहिली नाही; शरद पवार यांची टीका
- एवढ्या सूडबुद्धीने विरोधकांशी वागणारे सरकार आपण यापूर्वी पाहिले नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले. माझे सरकार एकेकाळी केंद्राने बरखास्त केले होते, पण अशी कटुता आमच्यात आलेली नव्हती.
- नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला फोन केला. मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका. भाजपशी लढून त्यांना हरविता येते. तिन्ही पक्ष मजबुतीने उभे राहायला हवेत, असे त्या म्हणाल्या. राज्यातील सरकार मजबूत आहे आणि राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली.