सर्वत्र सत्तेसाठीचे भाजपचे प्रयत्न ही हुकूमशाहीची नांदी: उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:38 AM2022-03-21T05:38:18+5:302022-03-21T05:39:25+5:30
शिवसैनिक हा धगधगता निखारा आहे. त्या धगधगत्या निखाऱ्याची धग आपल्या विरोधकांना जाणवली पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंचायत ते संसद हे भाजपचे स्वप्न आहे. सत्तेच्या ठिकाणी दुसरे कोणी असता कामा नये, या त्यांच्या धोरणाला रोखले पाहिजे. आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे. त्याला काटशह देणे गरजेचे आहे. आधी कोरोना आणि त्यानंतर मानेच्या दुखण्यामुळे एका जागी बसून राहावे लागले; परंतु, काही दिवसांत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेचे जिल्हाधिकारी आणि संपर्कप्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी रविवारी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडतानाच शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून तळागाळात शिवसेनेचा विचार पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसैनिक हा धगधगता निखारा आहे. सत्ता आल्यामुळे निखाऱ्यावर जमलेल्या राखेवर फुंकर मारायची आहे. त्या धगधगत्या निखाऱ्याची धग आपल्या विरोधकांना जाणवली पाहिजे. तोच शिवसंपर्क अभियानाचा उद्देश आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर बाकीचे आपण गांभीर्याने घेत नाही. ही भूमिका आता चालणार नाही. एकहाती सत्तेवर नंतर बोलू. पक्ष वाढवत असताना एकदा जरी जिंकलेली जागा असेल, तरी तिची माहिती माझ्याकडे आली पाहिजे. युती भाजपने तोडली; पण, त्यांनी बांधणी केली तशी आपल्याला करायची आहे.
शिवसेनेचे दूत म्हणून संपर्काला गेल्यावर चांगली नावे माझ्याकडे आली पाहिजेत. जुन्या शिवसैनिकांना आधार देण्याची गरज आहे. ज्या जागा परंपरागत भाजपकडे होत्या, तिथे आपण का लढत नाही? चांगले काम करणाऱ्यांना पुढे आणायला हवे. महिलांचे नेतृत्व समोर आणा. जिंकणारे उमेदवार हवेत. सदस्य, मतदार नोंदणी करीत सर्व निवडणुका गांभीर्याने लढवायच्या, असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.
यांनी खाल्ले की श्रीखंड आणि दुसऱ्यांनी खाल्ले तर...
- यांचे नुसते जबाब घेतले तर तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच ते लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात. दुसऱ्यांनी खाल्ले तर शेण आणि यांनी खाल्ले की श्रीखंड हा प्रकार लोकांसमोर आणायला हवा.
- खोटे बोलू शकत नाही, हा आपल्यात आणि भाजपमधला फरक आहे. खरे बोलणे हा अवगुण ठरत आहे; पण खोटे बोलून जिंकावे लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव नाही. भाजप अशाच पद्धतीने लढत जिंकत राहिला तर सत्यमेव जयतेच्या जागी असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य ठेवावे लागेल.
- १२ सदस्यांच्या निलंबनप्रकरणी न्यायालयाने कारवाई योग्यच ठरविली आहे. फक्त कालावधी कमी केलेला आहे. आपण खोटे काम अजिबात केलेले नाही. या लहान गोष्टी समोर येणे गरजेचे आहे. आमदार नियुक्तीवरही न्यायालयाने राज्यपालांवर ताशेरे ओढले आहेत. वर्ष होऊन गेले तरी काही नाही. हा सरकारचा अधिकार, तो न करणे हा लोकशाहीचा खून. काही झाले की लोकशाहीचा खून, अशी ओरड सुरू होते.