मुंबई- शिवसेनेचं हिंदुत्व गदाधारी आहे. देवेंद्र फडणवीस मध्यंतरी आम्हाला गधाधारी म्हणाले. पण आम्ही गध्यांना अडीच वर्षांपूर्वीच सोडलं असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. बीकेसीमधील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मनसेचा समाचार घेतला.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एक सभा झाली. त्यावेळी त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघालं. मुंबई स्वतंत्र करू म्हणाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणायला ती काय पारतंत्र्यात आहे का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. मूळात भाजप आणि स्वातंत्र्यांचा संबंध काय? स्वातंत्र्यावेळी भाजप नव्हता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात होता. पण त्यांचा स्वातंत्र्य लढाईत सहभागी नव्हता, असं ठाकरे म्हणाले.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानं त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. यावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. हो, आम्ही काँग्रेससोबत गेलो, मात्र ते उघड गेलो. आम्ही केलं ते उघड केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर पाप आणि तुमची सकाळची शपथ काय होती? जर ती यशस्वी झाली असती तर आज नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
औरंगाबादमध्ये औवेसींच्या झालेल्या सभेचा उल्लेख करताना भाजपच्या ए.बी.सी. टीमा पुढे केल्या जातात. कुणाला थडग्यावर डोकं टेकायला लावतात, कुणाला घंटा बडवायला दिला जातो, तर कुणाला भोंगा दिला जातो. आमच्या संभाजीनगरमध्ये असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.