Join us

मुंबई पालिकेतील शिवसेना नगरसेवकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 7:45 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावणे तीन तास साधला पालिकेतील शिवसेना नगरसेवकांशी संवाद

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गणपती उत्सव जवळ आला आहे,तर दुसरीकडे कोरोनाचे मुंबईचे संकट काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आहे.गेल्या दि,25 मार्च पासून लॉक डाऊन जाहिर झाल्या पासून नगरसेवक अविरत त्यांच्या प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. नगरसेवक हे त्या प्रभागातील कान व डोळे असून त्यांना त्यांच्या भागातील सर्व माहिती असते. त्यामुळे आगामी येणाऱ्या गणपती उत्सवाची तयारी तसेच कोविड, पाणी, रस्ते,मल: निस्सारण,धोकादायक इमारती,एसआरए या विविध विषयांवर शिवसेनेच्या पालिकेतील 97 नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2.15 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत झूम मिटींग घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

शिवसेनेच्या प्रत्येक विभागातील दोन नगरसेवकांची निवड करण्यात आली होती. या मिटींगला खासदार अनिल देसाई व राज्याचे परिवहन मंत्री अँड.अनिल परब उपस्थित होते. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अँड.सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे,माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह मुख्यमंत्र्याशी संवाद साधण्यासाठी निवडलेल्या एकूण ३० नगरसेवकांनी त्यांना दिलेल्या विषयांवर आपली मते प्रभावीपणे मांडली.

मिटींग खूपच चांगली झाली, सर्व संवादाचे रेकॉर्डींग झाले,विशेष म्हणजे तब्बल पावणे तीन तास खूप महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी आयोजित करून शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधला अशी माहिती सूत्रांनी दिली. गणपती विसर्जनाला होणारी गर्दी लक्षात घेता मूर्ती दान उपक्रम प्रत्येक वॉर्ड मध्ये राबवावा तसेच नैसर्गिक तलाव व बीचवर होणाऱ्या गर्दीला प्रतिबंध करा,प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, गणपती बरोबर येणारा नवरात्र उत्सव व छट पूजा यांचा देखील विचार करण्यात यावा, आता मुंबईत बऱ्याच ठिकाणी कोविड जंम्बो फॅसिलिटी सुरू केल्याने भगवती,शताब्दी, ट्रामा सेंटर सारख्या पालिकेच्या हॉस्पिटलचे नॉन कोविड मध्ये रूपांतर करा,कोरोनाचा लढा किती दिवस सुरू राहणार हे माहित नाही,त्यामुळे नगरसेवक निधीत वाढ करण्यात यावी,कोविड रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर वाढवा, पालिकेच्या आरोग्य खात्यातील स्टाफ वाढवा,कोरोना मुळे पालिकेची सर्वसाधारण सभा व स्टँडिंग कमिटीची मिटींग होत नाही ती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरू करावी,गट नेत्यांच्या बैठकीला आयुक्त उपास्थित राहात नाही यावर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

तसेच जेव्हीएलआर प्रकल्पाचे काम लवकर सुरू करावेत,कोरोनामुळे टेंडर मंजुरी मिळालेले रस्ते,मल: निस्सारण वाहिनी व अन्य बंद असलेल्या प्रकल्पाची कामे लवकर सुरू करावी अश्या अनेक सूचना शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना सादर केल्या.मुख्यमंत्र्यांचा नगरसेवकांशी संवाद सुरू असतांना जर एखादी चांगली सूचना असेल,तर मुख्यमंत्री ती सूचना लिहून घेत होते. काही नगरसेवक संवाद संवाद साधतांना आपली भूमिका मांडत असतांना आपण कोणाशी बोलत आहात याची तुम्हाला कल्पना आहे का? अशी समज पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यावेळी दिली.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस