Join us

CoronaVirus: राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; 'मास्कसक्ती'वर चर्चा, उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 8:34 PM

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी (इनडोअर) मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या गरजेवर भर दिला असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सची सोमवारी रात्री बैठक घेतली. तेव्हा ही चिंता त्यांच्या कानावर घालण्यात आली.  मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे, असे टास्क फोर्सने सांगितले.  

टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतर आज कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्याच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.  या बैठकीत मास्कच्या विषयावर चर्चा झालू असून राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्याची मागणी सर्व जिल्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच नागरिकांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी असे निर्देश उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्रात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे. आज ९२९ ॲक्टिव्ह केसेस आहेत. तसेच लसीकरण करण्यात आपण खूप पुढे आहोत. ६ ते १२ वयोगटासाठी नव्याने लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमावली आली की, लगेचच लसीकरण सुरु होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती करण्याबाबतची शिफारस टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, तसेच इतर सदस्य बैठकीला उपस्थित होते. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वत:वर घरच्या घरीच उपचार करून घेत आहे. त्यांना विलगीकरणातील आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही, असे निरीक्षणही टास्क फोर्सच्या सदस्यांनी नोंदविले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या