मुंबई-
राज्यात भोंग्यांच्या प्रश्नावरुन राजकीय वातावरण तापलेलं असताना ठाकरे सरकारनं या प्रश्नावर आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी लाऊडस्पीकरबाबत काही नियम केले आहेत. पण हा वाद अजूनही संपलेला नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतची मुदत दिली आहे. मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं आहे. पण ठाकरे सरकारनं आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे अनुपस्थितीत राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आजच्या बैठकीला भाजपाकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसंच इतर काही पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रसारमाध्यमांना बैठकी संदर्भातील माहिती देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत भोंग्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.