मुंबई: देशासह राज्यभरात ३ मे पर्यत लॉगडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात येत आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित टेवून कंटेनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळण्यासह नियमित मास्क घालणे आणि इतर कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत, असं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
देशभरात लॉकडाऊन वाढल्यानंतर गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये केंद्र सरकारकडून रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे.
आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे.