मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांना पूर्वी टीव्हीवर पाहिल्यावर मी बोलायचो की काय बडबड करतोय, पण आता जवळ आल्यावर समजलं हा खूप कामाचा माणूस आहे असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक केले. वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते रविवारी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे, अशी भावनिक सुरुवात करून उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे असे सांगितले. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान आहे. त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगारास घर कसे मिळेल ते आम्ही पाहत असल्याचे सांगत आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबई बाहेर जाऊ नका, असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची सोडत रविवारी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर , म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर ,सभापती म्हाडा विनोद घोसाळकर ,झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, सचिन अहिर उपस्थित होते.