शिवसेना अन् राष्ट्रवादीत मतभेद नाही; महाराष्ट्राला बदनाम करु नका, आम्ही एकत्र- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:15 AM2022-04-02T11:15:36+5:302022-04-02T14:23:00+5:30
आज पुन्हा उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुंबई : राज्याच्या गृह खात्याच्या कारभाराबद्दल शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळीच जाहीर नाराजी व्यक्त केल्याने या खात्याविषयी शिवसेना नाराज असल्याचे समोर आले. दुपारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तासभर चर्चा केली. गृह खात्यावर मुख्यमंत्री नाराज नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला. मात्र, यानिमित्ताने गृह खात्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीतील धुसफुस समोर आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र अशा बातम्यांचे खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आज पुन्हा उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच महाराष्ट्राला बदनाम करु नका, आम्ही सर्वजण एकत्र असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं वातावरण तयार केलं जातं सरकारमध्ये अजिबात मतभेद नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज जीएसटी भवनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली यावेळी ते बोलतं होते.
दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादीत गृह खात्यावरून धुसफुस समोर येताच माजी मंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कहानी मे ट्विस्ट’ आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्रिपद व गृहमंत्रिपदाची शिवसेना-राष्ट्रवादीत अदलाबदल होऊ शकते, असे पिल्लू त्यांनी सोडले. तर, ‘वळसे हे लेचेपेचे आहेत, ते गृहमंत्रिपदाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडे असले पाहिजे. ते राष्ट्रवादीकडे राहिले तर उद्या कधीही मातोश्रीवर पोलिसांचे कॅमेरे लागू शकतील, असे मी म्हटले होते अशी आठवण त्यांनी करून दिली.
काय म्हणाले वळसे पाटील?
गृहमंत्री वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी तासभर चर्चा केली. त्यानंतर गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असावे या चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता वळसे-पाटील म्हणाले की, त्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारले तर बरे होईल. मुख्यमंत्री गृहखात्याबाबत अजिबात नाराज नाहीत. संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. आमच्या विभागाकडून कमतरता होत असेल तर सुधारणा होईल.