Join us

'असा अलौकिक शिवआराधक होणे नाही'; मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 8:45 AM

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांनी आज सकाळी 5.07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. 

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे. 

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील,असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 5.17 मिनिटांनी निधन झाले. त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे.  

पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड- उपमुख्यमंत्री

“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची  मोठी  हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :बाबासाहेब पुरंदरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र