Join us

'बिपीन रावत यांच्या मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला'; उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 7:13 PM

सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई: तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १२ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. 

भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह १२ जणांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. 

डीएनए चाचणीच्या मदतीनं १३ मृतदेहांची ओळख पटवली जाणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे चॉपरचं सारथ्य होतं.

बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत हे बुधवारी दुपारी ३ वाजता हवाई दलाच्या  Mi-17VH हेलिकॉप्टरमधून नियोजित व्याख्यान देण्यासाठी कुन्नूर जिल्ह्यातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे जात होते. हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले होते आणि ते वेलिंग्टनला जात होते. यादरम्यान या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दरम्यान, हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.

चॉपरमध्ये कोण कोण होतं?-

बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. 

CCS ची महत्त्वाची बैठक-

हेलिकॉप्टर दुर्घटनेवर CCS ची (केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा संबंधी समिती) ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी सांगितले की, कुन्नूर, तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती संबंधित मंत्रालय योग्य वेळी देईल.

टॅग्स :बिपीन रावतउद्धव ठाकरेभारतीय जवानहेलिकॉप्टर दुर्घटना