Join us

ए तेला लूम किधल है बताना! मियाँदादचा 'तो' किस्सा सांगत ठाकरेंचा सोमय्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 9:40 PM

केंद्राची सुरक्षा असूनही यांच्यावर हल्ले होतात आणि मग हे सॉस लावून येतात; ठाकरेंचा सोमय्यांवर हल्लाबोल

मुंबई: शिवसेनेचं हिंदुत्व गदाधारी आहे. देवेंद्र फडणवीस मध्यंतरी आम्हाला गधाधारी म्हणाले. पण आम्ही गध्यांना अडीच वर्षांपूर्वीच सोडलं असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. बीकेसीमधील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मनसेचा समाचार घेतला. केंद्राची सुरक्षा असताना भाजप नेत्यांवर कसा काय हल्ला होतो, असा सवाल त्यांनी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावरून उपस्थित केला.

बऱ्याच वर्षांपूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद मातोश्रीवर येऊन गेला. भारत-पाकिस्तानचे सामने होऊ द्या, अशी त्याची मागणी होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून होणारे दहशतवादी हल्ले जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत सामने होणार नाहीत, असं बाळासाहेबांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, याची आठवण ठाकरेंनी करून दिली. 

बाळासाहेबांना त्यावेळी मियाँदादला एक प्रश्न विचारला. सामने सुरू असताना तुम्ही मध्येच माकडचाळे का करता, असं बाळासाहेबांनी त्याला विचारलं. त्यावर समोरच्या खेळाडूची लय बिघडवण्यासाठी, त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी आम्ही ते मुद्दाम करतो, असं त्यानं सांगितलं.

एके दिवशी सामना सुरू असताना मियाँदाद बॅट जमिनीवर ठोकत ठोकत प्रतिस्पर्धी गोलंदाजाकडे गेला. ए तेला लूम किधल है बताना, असं मियाँदाद त्याला सारखं विचारत होता. समोरच्या खेळाडूनं मग संतापून त्याला कशासाठी रुम विचारतोस, असा प्रश्न केला. त्यावर मेरे को ऊधर सिक्स मारने का है, असं मियाँदाद म्हणाला. मियाँदादच्या या स्लेजिंगमुळे त्या गोलंदाजाची लय बिघडली आणि मग मियाँदादनं त्याच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला, असा किस्सा ठाकरेंनी सांगितला.

ए तेला लूम किधल है बताना, असं मियाँदादनं विचारलं होतं. तो बोबड्या आवाजात बोलत होता. अशीच बोलणारी काही माणसं आपल्या आसपासही आहेत. स्वत: काहीतरी करण्याची कुवत त्यांच्यात नाही. पण केवळ आपली लय बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असं म्हणत ठाकरेंनी सोमय्यांना नाव न घेता टोला लगावला.

टॅग्स :उद्धव ठाकरेकिरीट सोमय्याजावेद मियादाद