Join us

उद्धव ठाकरेंच्या हस्ते २६ इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 3:19 PM

प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळेल आणि बेस्टसाठी त्या चालवण्याचा खर्च किमान स्तरावर राहील, याची काळजी घेऊन या बसेस तयार करण्यात आल्या आहेत.  

मुंबई: टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज आपले बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्टसोबतचे नाते अधिक दृढ करत २६ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसची डिलिव्हरी केली. या डिलिव्हरीसह बेस्टला इलेक्ट्रिक बससेवा देणा-या पहिल्या ग्रॉस कॉस्ट काँट्रॅक्टची सुरुवात झाली.

भारत सरकारच्या फेम टू उपक्रमांतर्गत बेस्टने दिलेल्या ३४० इलेक्ट्रिक बसेसच्या मोठ्या ऑर्डरचा एक भाग आज डिलिव्हर करण्यात आला. उर्वरित बसेसही वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने डिलिव्हर केल्या जाणार आहेत. २५ आसनी टाटा अल्ट्रा अर्बन ९/९ इलेक्ट्रिक बसेसना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे झालेल्या एका समारंभात हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्र सरकार, बेस्ट आणि टाटा मोटर्सचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. टाटा मोटर्स बॅकबे, वरळी, मालवणी आणि शिवाजी नगर अशा मुंबईतील चार डेपोंतील बसेससाठी संपूर्ण चार्जिंग संरचना उभारणार तसेच तैनात करणार आहे. त्याचप्रमाणे या संरचनेची देखभाल करणार आहे व ती चालवणारही आहे. 

‘वन टाटा’ या अनोख्या उपक्रमांतर्गत कंपनी आपल्या समूहातील विविध कंपन्यांच्या खास कौशल्यांचा लाभ घेत आहे. वीजपुरवठ्यासह सर्व अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम विद्युत सुविधा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन टाटा पॉवर यात योगदान देत आहे. बस चार्जिंगच्या संपूर्ण आस्थापनाची जबाबदारीही टाटा पॉवरच उचलणार आहे. टाटा ऑटो कम्पोनण्ट्स ही कंपनीही या उपक्रमाखाली टाटा मोटर्सला निवडक घटकांसाठी सहयोग, डिझाइन, विकास, सोर्सिंग आणि पुरवठा करणार आहे. इलेक्ट्रिक बसेस टाटा मोटर्सने नवीनतम उत्पादन तंत्रज्ञान वापरून पूर्णपणे एतद्देशीय स्तरावर विकसित केल्या आहेत.  प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळेल आणि बेस्टसाठी त्या चालवण्याचा खर्च किमान स्तरावर राहील, याची काळजी घेऊन या बसेस तयार करण्यात आल्या आहेत.  

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष गिरीश वाघ यावेळी म्हणाले, “मुंबई शहरासाठी तयार करावयाच्या ३४० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या २६ बसेसची डिलिव्हरी देताना टाटा मोटर्सला आनंद होत आहे. मुंबईकरांचा आराम व सोय ध्यानात घेऊन या बसेस खास डिझाइन करण्यात आल्या आहेत. यामध्ये विकलांग प्रवेशांसाठी “लिफ्ट मेकॅनिझम”देखील आहे. टाटा मोटर्स उत्पादनाचे जागतिक मानक आणि वाहन विकास केंद्र यांच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहतूक सोल्युशन्समध्ये नवोन्मेषकारी काम करत आहे व या क्षेत्रात आघाडीवर आहे. सरकारच्या विद्युतीकरणाच्या मोहिमेत आम्ही सक्रिय भूमिका सातत्याने बजावत राहू.”

२५ आसनी टाटा अल्ट्रा अर्बन एसी इलेक्ट्रिक बसेस चालकाच्या व प्रवाशांच्या आरामासाठी प्रगत सुविधांनी युक्त आहेत. ‘लिफ्ट मेकॅनिझम’ हा ऑटोमेटेड रॅम्पचाच विस्तार आहे. त्यामुळे विकलांग प्रवाशांना बसमध्ये चढणे तसेच बसमधून उतरणे सोपे होणार आहे. याशिवाय एर्गोनॉमिक आसनव्यवस्था, प्रशस्त अंतर्गत रचना, चार्जिंग पोर्टससारख्या सुविधा, प्रवासातील कनेक्टिविटीसाठी वाय-फाय हॉटस्पॉट, प्रशस्त प्रवेश व निर्गमन जागा आदी सुविधांनी बसेस युक्त आहेत. पूर्णपणे इलेक्ट्रिक तत्त्वावरील बसेस इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस), टेलीमॅटिक्स प्रणाली, रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम यांसारख्या कार्यक्षम व सुरळीत ऑपरेशन्ससाठी आवश्यक सुविधांनी युक्त आहेत. टाटा मोटर्सने हिमाचल प्रदेश, चंडीगढ, आसाम व महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये बसेसच्या चाचण्या घेऊन विविध भूप्रदेशांतील कामगिरी तपासून बघितली आहे. 

टाटा मोटर्सने फेम वन उपक्रमांतर्गत भारतातील ५ शहरांमध्ये २१५ इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे. या बसेसना एसटीयू व प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या सर्व इलेक्ट्रिक बसेसने एकत्रितपणे ४ दशलक्ष किलोमीटर्सचे अंतर कापले आहे आणि त्यायोगे टाटा मोटर्सला इलेक्ट्रिक बस उत्पादन श्रेणीमध्ये आणखी नवोन्मेष तसेच अपग्रेड करण्यासाठी आवश्यक असा महत्त्वाचा डेटा व आकडेवारी मिळाली आहे. फेम वन अंतर्गत आलेल्या निविदांसह टाटा मोटर्सला अनेक राज्यांमधील परिवहन यंत्रणांकडून फेम फेज टूखाली ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. यांमध्ये एजेएलकडून ६० बसेसची ऑर्डर, जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडची १०० बसेसची ऑर्डर आणि मुंबईतील बेस्टची ३०० बसेसची ऑर्डर यांचा समावेश होतो.  याशिवाय, टाटा मोटर्सने एमएमआरडीएला २५ हायब्रिड बसेस डिलिव्हर केल्या आहेत. या भारतातील पहिल्या खास विकलांग व्यक्तींसाठी तयार केलेल्या बसेस आहेत.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार