CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 08:19 AM2020-07-26T08:19:12+5:302020-07-26T09:15:13+5:30
CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढे नागपूरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग मी शिस्तीच्या मागे उभा आहे
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजपा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट तुकाराम मुंढेंविरोधात केंद्राला पत्र लिहिलं होतं. या सर्व घडामोडीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.
तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरु आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुंढे यांनी पंगा घेतला असा प्रश्न संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारला, त्यावर ते म्हणाले की, तुम्ही ही सचिवांची यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या, मंत्रालय की सचिवालय हा वाद कशाला हवा? सचिव पद्धतच बंद करुन टाका, पिन टू पियानो म्हणजे ए टू झेड ऑर्डर पण तुम्हीच काढायची, काम पण तुम्हीच करायची, मदतीचं वाटप सगळं तुम्हीच करायचं असा टोला त्यांनी भाजपा नेत्यांना लगावला.(CM Uddhav Thackeray Interview)
तसेच तुकाराम मुंढे नागपूरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग मी शिस्तीच्या मागे उभा आहे. एखाद्या अधिकाराच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? काही नियम, कायदे कडकपणाने अमलात आणले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करु नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगले आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल, तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली.(CM Uddhav Thackeray Interview)
कोण आहेत तुकाराम मुंढे?
महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांची ४ वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सध्या मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत.
पाहा व्हिडीओ