मुंबई- कितीही विरोध झाला तरी उद्या सकाळी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला.
आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही १०० वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही असेही रवी राणा यांनी म्हटले.
मातोश्रीबाहेर आज सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलं होतं. शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या सर्व शिवसैनिकांचे हात जोडून आभार मानले.
दरम्यान, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. दहशतवादी नाही. आम्ही काही शस्त्र हातात घेऊन मातोश्रीवर जात नाहीय. आम्ही तर हनुमान चालीसा घेऊन जाणार आहोत. शिवसैनिकांनी आम्हाला आव्हान दिलं. तुमचा हनुमान चालीसाला विरोधा का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच", असं नवनीत राणा यांनी म्हटलं.
संजय राऊत हे पोपट-
नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. संजय राऊतांनी तुमचा उल्लेख बंटी-बबली असा केला आहे. असं विचारलं असता नवनीत राणा यांनी संजय राऊत हे तर पोपट आहेत. रोज सकाळी पत्रकारांना बोलावून बडबड करतात, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार असल्याचे नवनीत राणाने म्हटले. शिवसैनिक आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यांनी मुंबईत पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आम्ही मुंबईत आलो आहोत, असं वक्तव्य देखील राणा दाम्पत्याने केलं आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद आणखी रंगणार असल्याचे दिसून येत आहे.