...म्हणून मुख्यमंत्री ठाकरे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता धूसर

By कुणाल गवाणकर | Published: January 25, 2021 10:44 AM2021-01-25T10:44:43+5:302021-01-25T10:49:29+5:30

शेतकऱ्यांचा मोर्चा थोड्याच वेळात राजभवनावर धडकणार; महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार

cm uddhav thackeray may not join kisan morcha in mumbai | ...म्हणून मुख्यमंत्री ठाकरे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता धूसर

...म्हणून मुख्यमंत्री ठाकरे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता धूसर

Next

मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. नाशिकहून आलेला मोर्चा सध्या आझाद मैदानात असून थोड्याच वेळात तो राजभवनावर धडकणार आहे. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या आंदोलनात सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ही शक्यता धूसर झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकरी मोर्चात सहभागी होऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. उद्धव ठाकरे घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा निघू नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं वृत्त एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. शरद पवारांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मोर्चात सहभागी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. मात्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते आणि मंत्री या मोर्चात सहभागी होतील.

आंदोलक शेतकऱ्यांचा जत्था आझाद मैदानात दाखल; आज राजभवनाच्या दिशेने निघणार

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जत्था इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला. अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली. १५ हजार शेतकरी कसारा घाट पायी उतरले. त्यानंतर वाहनांतून निघालेल्या आंदोलकांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले.
 

Web Title: cm uddhav thackeray may not join kisan morcha in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.