Join us

तुम्ही अजूनही युवासेनेत! मुख्यमंत्री 'फायर आजीं'च्या भेटीला; ठाकरेंकडून आजींना खास निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 7:27 PM

मुख्यमंत्री ठाकरे सहकुटुंब आजी चंद्रभागा शिंदेंच्या भेटीला; ठाकरेंकडून आजींचं तोंडभरुन कौतुक

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्रीबाहेर जमले. यामध्ये ८० वर्षांच्या एका आजींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री ठाकरेंनी आज संध्याकाळी या आजींची भेट घेतली. आजींच्या भेटीसाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब परळच्या त्यांच्या घरी गेलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमच्या घरी आले. त्यांचे पाय आमच्या घराला लागले. त्यामुळे आनंद झाल्याची भावना आजी चंद्रभागा शिंदेंनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी असल्याचं आजी मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तोंडावरचा मास्क हटवला आणि आजींसोबत संवाद साधला. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

आजींसारखे शिवसैनिक हाच मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. 'माणसाचं वय कितीही वाढलं, तरी तो मनानं तरुण हवा, असं बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढलं आहे. पण त्या अजूनही युवासेनेच्याच कार्यकर्त्या आहेत,' अशा शब्दांत ठाकरेंनी आजींचं कौतुक केलं. मातोश्रीवर येऊन गेलात, आता वर्षावर सहकुटुंब या, असं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मातोश्रीवर रणरणत्या उन्हात काल चंद्रभागा शिंदे शिवसैनिकांसोबत ठिय्या मांडून बसल्या होत्या. त्यांना मातोश्रीच्या आत बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर मातोश्रीबाहेर पडताना 'झुकेगा नहीं' म्हणत आजींनी त्यांचा स्वॅग दाखवला. आजींचा हाच स्वॅग मुख्यमंत्र्यांसमोरही पाहायला मिळाला. त्यावर शिवसैनिक झुकनेवाला नही है, म्हणत ठाकरेंनी आजींचं कौतुक केलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरे