Join us

पीएम मोदी आज मुंबईत; सीएम ठाकरे प्रोटोकॉल पाळणार नाहीत? नेमकं चाललंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 1:19 PM

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर आज एकाच मंचावर येणार

मुंबई: पहिलावहिला लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं बऱ्याच कालावधीनंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत. मात्र पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे विमानतळावर जाणार नसल्याचं वृत्त टीव्ही९ मराठीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या जागी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मोदींच्या स्वागताला जातील, अशी माहिती आहे.

मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं वितरण आज संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात होईल. संध्याकाळी ५ वाजता सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी मोदी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होतील. पंतप्रधान ज्या राज्यात जातात, त्या राज्याचे मुख्यमंत्री स्वागतासाठी जातात. तसा प्रोटोकॉल आहे. मात्र ठाकरे मोदींच्या स्वागताला जाणार नसल्याचं समजतं.

उद्धव ठाकरे स्वागतासाठी का जाणार नाहीत, त्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ठाकरेंच्या जागी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मोदींच्या स्वागताला जातील, अशी सुत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्यानं कारवाया सुरू आहेत. त्यावरून शिवसेना आणि भाजपचे संबंध बिघडले आहेत. कधीकाळी मित्र असलेले दोन पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं आजच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेसुभाष देसाई