Join us

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 9:02 AM

देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

मुंबई:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियतेवर आयएएनएस आणि सी व्होटर्सने संयुक्तरित्या सर्व्हे केला आहे. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानावर असल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले होते. 

देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचा समावेश सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत करण्यात आला आहे. आयएएनएस आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्व्हेनुसार उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्याच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे फेसबुक पोस्टद्वारे म्हणाले की, मुख्यमंत्री हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. तसेच शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आर्शिवाद या शिवाय ही झेप शक्य नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळताच कोरोनाचे संकट, विरोधी पक्षाचे आंदोलन आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा सामना अशा बिकट परिस्थितीतून सकारात्मकतेने मार्ग काढल्याने जनतेने त्यांना  लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारशिवसेनामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस